Saturday, 23 March 2019

सहजीवन

"नलु...ए नलु येतेस ना चहा प्यायला"? माधव काका नलु काकूंना बोलवत होते.गेली ७ वर्षे रोज सकाळी मला या गोड हाका ऐकू येतात.सुरुवातीला नवल वाटायचं पण आता सवय झाली.
      सात वर्षांपूर्वी नलु काकू आणि माधव काका आमच्या शेजारी रहायला आले.तेव्हा दोघेही साठीच्या पुढचे होते.सून आणि मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता.मुलगीही परदेशातच होती.मोठ घर होतं पण दोघच काय करणार? म्हणून ते घर विकलं आणि इथे आमच्या शेजारी हा छोटासा 1 BHK फ्लॅट घेतला आणि बाकीची रक्कम बॅंकेत जमा केली होती.
      रोज सकाळी ६ ते ६:३० फिरून यायचं.आल्यावर काकू गॅलरीत जावून त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी घालायच्या.तोपर्यंत काका चहा बनवायचे.नंतर रेडिओवरील गाणी आणि पेपर सोबत चहाचा आस्वाद घेत.मला त्यांचा हा परिपाठ नक्की माहित झाला होता.
      नवीन येणाऱ्या कोणालाही हे सगळं बघून किती सुखी , आनंदी आहेत असं वाटायचं पण त्यांच्या सुखाला ही दु:खाचं कोंदण होतच.
       माधव काका आणि नलु काकू दोघांनीही काटकसरीत सगळे अडथळे दूर करत संसार केला , मूल शिकवली पण मूलीने परदेशात शिकायला जावून तिकडेच लव्ह मॅरेज केले.आई - वडिलांचा फक्त आशीर्वाद मागितला... आणि सून इकडचीच ओळखीची असूनही तिला ह्यांची अडगळ वाटत होती. त्यामुळे मुलाने तिकडेच रहायचा निर्णय घेतला.पैसे पाठवायचा पण दोघेही स्वाभिमानी  त्यांनी स्वत‌:च स्वत:ची सोय केली.काकू खूप दुःखी झाल्या होत्या पण काकांनी त्यांना यातून बाहेर काढले.जो आपला तरूणपणातील सहवास राहीला आहे तो आता आपण पूर्ण करू.आनंदात राहू.असे सांगितले आणि खरंच माझ्या शेजारी आल्यापासून त्यांचे सहजीवन सुरू झाले.
       तरूणपणातील सहवास हा अपेक्षांचा , मोहाचा असतो , रूसव्या , फुगव्यांचा असतो पण हा सहवास निरपेक्ष असतो . त्याला मोहाचा सुगंध नसतो त्यामुळे तो आनंददायी ठरतो.त्या दोघांकडे बघून खरच मलाही खूप आनंद वाटायचा.दोघांनी स्वत:त दुसर्याला खरे पणाने सामावून घेतले होते.फूल आणि सुगंधासारखे झाले होते त्यांचे ! पूर्वीच्या राहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करून त्यात ते आनंद मिळवत होते.ज्यापासून त्रास होईल , दु:ख होईल त्यापासून शक्यतो दूर राहायचे तरीपण कधीतरी ती छटा दिसायची.त्यावेळेस किशोर आणि रफी यांच्या विशिष्ट गाण्याची धून त्यांच्या घरातून ऐकायला आली की मग मलाही हूरहूर लागायची आणि मी काकूंकडे काहीतरी निमित्त्य काढून जायची , त्यांच्याशी हलक्या-फुलक्या गप्पा मारायची.मग काकूंना ही बरं वाटायचं.
         खरच किती आनंदाने रहात होते दोघे! त्यांच्या आयुष्याला लागलेली दु:खाची किनार त्यांचं दुःख पुसु पहात होती.त्यांच्या सहजीवनाच्या झाडावरची फुल गळून पडली होती पण त्यांचं सहजीवनाच झाड अजून ही उमलू पहात होत ... एकमेकांच्या भरभक्कम आधाराने तजेलदार होऊ पहात होत.....
                           - प्राजश